नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना झेड श्रेणी सुरक्षा देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दलाई लामा यांच्या सुरक्षिततेसंदर्भात गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
झेड सुरक्षेअंतर्गत, दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी आता एकूण ३३ सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. यात १२ कमांडो आणि ६ पीएसओंचा समावेश असेल. जे त्यांना २४ तास सुरक्षा प्रदान करतील. तसेच १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड त्यांच्या निवासस्थानी तैनात असतील. दलाई लामा यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित चालक आणि देखरेखीसाठी कर्मचारी सेवेवस असतील.
याशिवया १२ कमांडो तीन शिफ्टमध्ये त्यांना सुरक्षिवर असतील. दलाई लामा हे १९५९ मध्ये चीनविरुद्धचे एक बंड अयशस्वी झाल्यानंतर, भारतात आले होते. गेल्या काही वर्षांपासून गुप्तचर अहवालात चीन समर्थित घटकांसह विविध संस्थांकडून दलाई लामा यांच्या जीवाला संबाव्य धोका असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे त्यांची सुरक्षितता भारतीय अधिका-यांसाठी अत्यंत महत्वाची बनली आहे.
भारत सरकारने दलाई लामा यांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. १९४० मध्ये, तिबेटची राजधानी ल्हासा येथे त्यांना १४ वे दलाई लामा म्हणून मान्यता देण्यात आली. ते गेल्या अनेक वर्षांपासून तिबेटी लोकांच्या न्यायासाठी आवाज उठवत आहेत. १९८९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यांनी सहा खंड आणि ६७ हून अधिक देशांचा दौराही केला आहे. ते जुलै महिन्यात ९० वर्षांचे होत आहेत.