पुणे : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू असून, निवडणुकी दरम्यान बाजारात फुलांना मागणी वाढली असून, फूल उत्पादक शेतक-यांना चांगला आर्थिक लाभ होत आहे. तसेच फुलांनी बनविलेला हार तयार करणा-या कारागिरांनाही रोजगार मिळत असल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणुकीत प्रचारासाठी दिग्गज नेत्यांना बोलविण्यात येत आहे. विविध पक्षांचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात कॉर्नर सभा घेऊन पदयात्रा, रॅली काढत आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून फुले उधळून, क्रेनद्वारे भलामोठा पुष्पहार घालून उमेदवारांचे, नेत्यांचे जंगी स्वागत केले जात आहे.
राजकीय सभेत, रॅलीत वा मोठ्या नेत्यांच्या स्वागतासाठी क्रेनद्वारे १५ ते २० फुटांचा हार घालण्याचा ‘ट्रेंड’ सध्या जोरात आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, नेत्यांच्या, उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून हारांची मागणी वाढली आहे. दरम्यान, जळगावात झेंडूच्या फुलांना मागणी देखील चांगलीच वाढली आहे.
हार बनविण्यासाठी लागतात चार तास
साधारणत: पंधरा थरांमध्ये १५ ते २० फुटांचा हार बनविला जातो. हार बनविण्यासाठी झेंडू, अष्टर, शेवंती या फुलांचा वापर केला जात आहे. १५ ते २० फुटांच्या हारासाठी साधारण १०० ते १३० किलो फुलांचा वापर केला जात असतो. अशा प्रकारे हार बनविण्यासाठी पाच ते सहा कारागिरांना साधारण तीन ते चार तास लागत असल्याचे फुलमाळा विक्रेत्यांनी सांगितले.