अहमदनगर : माणुसकीच्या नात्याने एखाद्याला आपल्या गाडीतून रात्रीच्या वेळी लिफ्ट देणे किती महागात पडू शकते याची प्रचीती अहमदनगरच्या एका वाहनचालकाला आली आहे. गाडीत लिफ्ट दिल्यानंतर मागे बसलेल्या माणसाने त्यांच्या डोक्यात जबर वार केला आणि जखमी केले. त्यानंतर या चोरांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव कौडा येथील सचिन पठारे आपल्या चारचाकी वाहनातून सुपा येथे त्यांच्या कंपनीचे मॅनेजर यांना घरी सोडून परतत असताना रात्रीच्या वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना लिफ्ट मागितली. हे प्रवासी गाडीमध्ये बसले. मागच्या सीटवर बसलेल्या या दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने हातोड्याने सचिन पठारे यांच्या डोक्यावर वार करून जबर जखमी केले आणि त्यांची गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
पोलिसांनी चक्रे फिरवली
या प्रकरणी सचिन पठारे यांनी सुपा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदनगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एक टीम बनवून आरोपींचा शोध सुरू केला.