तेलअवीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गाझामधील खान युनिस शहरात इस्रायली सैनिक आणि हमासमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. गेल्या २४ तासांत इस्रायलच्या लष्करी कारवाईत ३०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, तर ५५० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक महिला आणि लहान मुले आहेत. यासोबतच इस्रायल संरक्षण दलाने हमासच्या एका वरिष्ठ कमांडरला ठार केल्याचा दावा केला आहे.
आयडीएफच्या म्हणण्यानुसार, बॉम्बस्फोटादरम्यान हमासच्या शेजॅया बटालियनचे डिप्टी कमांडर इमाद क्रिके मारला गेला. इमादने या बटालियन कमांडरच्या मृत्यूनंतर ही जागा घेतली होती. तो अँटी टँक मिलसाईल यूनिटचा प्रमुख होता. इस्रायली सैन्याने यापूर्वीच अनेक वेळा विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना खान युनिस शहरातून बाहेर जाण्यास सांगितले आहे जेणेकरून ते हमासला संपवू शकतील. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे. हमासच्या लढवय्यांनी शस्त्रे खाली न ठेवल्यास हा लढा आणखी तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले अलिकडच्या काही दिवसांत, हमासचे अनेक दहशतवादी आमच्या सैन्याला शरण आले आहेत.
ते आपले शस्त्र खाली ठेवत आहेत. ते स्वत:ला आमच्या शूर सैनिकांच्या स्वाधीन करत आहेत. मी हमासच्या दहशतवाद्यांना सांगतो की, आमच्या सैन्यासमोर सरेंडर करा आणि स्वत:चा जीव वाचवा. इस्रायल गेल्या दोन महिन्यांपासून गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई करत आहे. त्यामुळे येथील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही गाझा पट्टीतील आरोग्य सेवा उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, इस्रायलच्या कारवाईमुळे गाझाची आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी, पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीचे प्रमुख फिलिप लाझारीनी यांनी आरोप केला आहे की, इस्रायल गाझामधून पॅलेस्टिनींना इजिप्तमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ते संपूर्ण गाझा पट्टी आपल्या ताब्यात घेऊ शकेल. मात्र, इस्रायलने हा अत्यंत गंभीर आरोप फेटाळून लावला आहे.
युद्ध दिवसेंदिवस अधिक आक्रमक
युद्धबंदीनंतर हमास आणि इस्रायलमध्ये सुरू झालेले युद्ध दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. एकीकडे इस्रायली सैन्य हवेतून आणि जमिनीवरून एकाच वेळी बॉम्ब आणि गोळ्यांचा वर्षाव करत आहे, तर दुसरीकडे हमास रॉकेटद्वारे त्यांना लक्ष्य करत आहे. शनिवारी हमासच्या हल्ल्यात इस्रायली संरक्षण दलाचे पाच सैनिक ठार झाले. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझामध्ये उपस्थित असलेल्या हमासचे २५० दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.