22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याची अंतिम मतदारयादी जाहीर

राज्याची अंतिम मतदारयादी जाहीर

मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाखांवर

पुणे : राज्याची अंतिम मतदारयादी अखेर जाहीर करण्यात आली असून राज्यात ९ कोटी १२ लाख ४३ हजार १० मतदार येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानास पात्र ठरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीच्या तुलनेत अंतिम मतदारयादीत १८ ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या १४ लाख ३ हजार ७९८ ने वाढून ही संख्या आता १ कोटी ७३ लाख ६३ हजार ८६५ इतकी झाली आहे.

यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करून २३ जानेवारी २०२४ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला गेला. या काळात राज्यात २४ लाख ३३ हजार ७६६ मतदारांनी नव्याने नावनोंदणी केली. तर २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदारयादीमध्ये ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची निवळ वाढ झाली आहे. नव्याने वाढलेल्या मतदारांमध्ये १ लाख १ हजार ८६९ पुरुष, ३ लाख ८ हजार ३०६ स्त्री मतदार तसेच ५७२ तृतीयपंथी मतदारांची निवळ वाढ झाली आहे. त्यामुळे मतदारयादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९१७ वरून ९२२ इतके झाले आहे.

राज्यात एकूण मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाख ४३ हजार १० इतकी झाली आहे. त्यात ४ कोटी ७४ लाख ७२ हजार ३७९ पुरुष, ४ कोटी ३७ लाख ६६ हजार ८०८ स्त्री मतदार तर ५ हजार ४९२ तृतीयपंथी मतदार आहेत. या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये ६ लाख ७० हजार ३०२ मतदारांची नव्याने भर पडली आहे. तर २० ते २९ या वयोगटात ८ लाख ३३ हजार ४९६ मतदारांची वाढ झाली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या ३ लाख ४८ हजार ६९१ (०.३८ टक्के) होती, ती अंतिम मतदारयादीत ही संख्या १० लाख १८ हजार ९९३ (१.१२ टक्के) इतकी झाली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या १ कोटी ५५ लाख ११ हजार ३७६ (१७.८ टक्के) होती. ती अंतिम यादीत १ कोटी ६३ लाख ४४ हजार ८७२ (१७.९१ टक्के) इतकी झाली आहे.
……….

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR