पणजी : तो दिवस भारतासाठी नव्या स्वातंत्र्यासारखा असेल जेंव्हा भारत पेट्रोल किंवा डिझेलचा एक थेंबही आयात करणार नाही. निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे हा देशभक्ती आणि स्वदेशीचा स्वीकार करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा नवा मार्ग आहे. असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. मी तो दिवस भारतासाठी नवीन स्वातंत्र्य मानतो, जेंव्हा पेट्रोल आणि डिझेलचा एक थेंबही देशात आयात केला जाणार नाही. ते पणजी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे दहशवादाशी जोडलेले आहे. जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबणार नाही, तोपर्यंत जगभरातील दहशतवादही संपणार नाही. पेट्रोल आणि डिझेलची आयात थांबवणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. पेट्रोल आणि डिझेलचे आयात बिल सध्या १६ लाख कोटी रुपये आहे. जर आपण ही आयात कमी केली तर आपण वाचवलेला पैसा गरिबांकडे जाईल. यामुळे आम्ही जैवइंधनासारखे पर्यायी इंधन आणले आहे. आयातीतील घट आणि निर्यातीत वाढ हा देशभक्ती आणि स्वदेशीचा अंगीकार करून पुढे जाण्याचा मार्ग आहे.
‘या’ क्षेत्रात ४.५ कोटी लोकांना रोजगार
केंद्रीय मंत्री म्हणाले की, जेंव्हा त्यांनी पदभार स्वीकारला तेंव्हा भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार ७ लाख कोटी रुपये होता. आता तो उद्योग वाढून १२.५ लाख कोटी रुपयांचा झाला असून या क्षेत्रात ४.५ कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. याशिवाय, ऑटोमोबाईल उद्योग देखील सरकारांना जास्तीत जास्त जीएसटी महसूल प्रदान करतो.