नवी दिल्ली : मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम ग्रुप) च्या नंतर केंद्र सरकारने आता तहरीक-ए-हुर्रियत वर देखील बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल माहिती दिली असून त्यांनी दहशतवादी कारवायांमुळे या संघटनेवर युएपीए अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाहांनी सांगितले की, ही संघटना जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी आणि इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी अवैध कारवायांमध्ये गुतली होती.
हा गट जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद वाढवण्यासाठी भारत विरोधी प्रचार आणि दहशतवादी कारवाया करत आला आहे. दहशतवादाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झीरो टॉलरंस पॉलिसीअंतर्गत भारत विरोधी कारवायांमध्ये सहभाग आढळलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेचे प्रयत्न हाणून पाडले जातील. यापूर्वी २७ डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने मुस्लीम लीग जम्मू काश्मीर(मसरत आलम ग्रुप)वर बंदी घातली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते की देशविरोधी कारवाया केल्याने या संघटनेवर युएपीए अंतर्गत पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.