छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न, कांदा, सोयाबीनसह मराठा आरक्षणाच्या मुद्याने जमिनीवर आणले. निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता सरकार खडबडून जागे झाले असून स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार नोकरभरतीच्या घोषणेवर काय काम केले, याची माहिती सरकारने विविध विभागांकडून शुक्रवारी सकाळी ११:०० वाजेपर्यंत मागविली आहे.
७५ हजार नोकरभरतीची घोषणा होऊन २ वर्षे झाली. मात्र, मंत्रालयातील वेळकाढू अधिकारी व झारीतील शुक्राचार्यांनी घोषणेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. परिणामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नोकरभरतीबाबत ज्या विभागाने हलगर्जीपणा केला असेल, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सरकारने छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक या विभागातून किती नोकरभरती झाली, याची माहिती विभागनिहाय मागविली आहे. निवडणुकीपुर्वी राजकारणात सत्ता हेच अंतिम ध्येय असल्याने सत्तेसाठी काही पण करण्याची भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेली दिसत होती. सत्ता जाताच सत्ताधा-यांवर व आपल्याच यंत्रणेवर तुटुन पडण्याचे नवे धोरण सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी स्वीकारल्यामुळे सुन्न करणारे किळसवाणे राजकारण राज्यात बघायला मिळाले.
सर्वच राजकीय पक्षांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत मतदारांच्या नजरेतून पडण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र बघायला मिळाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाने बिहार आणि उत्तर प्रदेश च्या राजकीय संस्कृतीला मागे टाकल्याचे अनेक वेळा दाखवून दिले आहे. सत्ता राजकीय पक्षांसाठी प्राणवायू किंवा सलाईन किंवा वेंटिलेटर पर्यंत नेऊ शकते याचे ओंगाळवाणे राजकीय प्रदर्शन केले जाते.
मंत्रालय पातळीवरील सर्व विभागांना पत्र
अपर मुख्य सचिव (सेवा) विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी गुरुवारी सर्व सहसचिव, उपसचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, स्वातंर्त्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत ७५ हजार रिक्त पदे भरण्यासाठी आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे, हे कळवावे.
या माहितीचा मागविला अहवाल
ऑगस्ट २०२३ ते मे २०२४ अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या, परीक्षेचा निकाल लागला असून, नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासणी सुरू असलेल्या पदांची संख्या, कंपनीबरोबर करारनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही, अशा पदांची संख्या, या माहितीचा अहवाल प्रशासकीय विभागांकडून सरकारने मागविला आहे. अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे म्हणाले की बहुतांश नोकरभरती झालेली आहे. नोकरभरतीची माहिती मागविली आहे. सोमवारपर्यंत माहिती येईल.