24.4 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeराष्ट्रीयविकासाचे चक्र मंदावले, रुपयाही घसरला

विकासाचे चक्र मंदावले, रुपयाही घसरला

महागाई शिगेला, उत्पादन क्षेत्राची वाढ ११ महिन्यांच्या नीच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मागील दिवस निराशाजनक राहिले आहेत. आर्थिक विकासाच्या आघाडीवर दुस-या तिमाहीत जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिली तर महागाई शिगेला असताना रुपया रसातळाला पोहोचला आहे. याशिवाय नोव्हेंबरमध्ये उत्पादन क्षेत्राची वाढ ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली असून जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपन्यांची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटले असून विदेशी गुंतवणूकदार पैसे काढण्याच्या घाईत आहेत.

या दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणा-या डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर १०० टक्के शुल्क लागू करण्याचा इशारा दिल्यावर आता भारतीय इकॉनॉमीही चीनच्या मार्गाने जात आहे का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुस-या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाची आर्थिक वाढ ५.४ टक्क्यांपर्यंत राहिली. जी जवळपास दोन वर्षांतील सर्वात कमी पातळी आहे.

उत्पादन क्षेत्राची खराब कामगिरी आणि उपभोगातील मंदी यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला. पण भारत सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्थेचा मान कायम ठेवला. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत चीनचा जीडीपी वाढीचा दर ४.६ टक्के होता.

दरम्यान, महागाईने कहर केला असून, ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ ६.२१ टक्के झाली, जी १४ महिन्यांतील सर्वोच्च आहे. प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे महागाईचा भडका उडाला असून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीपीआय आधारित महागाई दर ४.८७ टक्के होता. त्याचवेळी किरकोळ महागाई रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेच्या वर गेल्याची गेल्या वर्षी ऑगस्टनंतर ही पहिलीच वेळ ठरली. वाढत्या महागाईमुळे आरबीआय व्याजदरात कपात करण्याची शक्यता पुन्हा एकदा मावळली आहे.

रुपयाने तळ गाठला
मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात भारतीय चलन ४ पैशांनी घसरून ८४.७६ प्रतिडॉलरच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरले असून जागतिक बाजारात डॉलरची मजबूती आणि सतत परकीय भांडवल काढून घेतल्याने गुंतवणूकदारांच्या भावना प्रभावित झाल्याने रुपयाची स्थिती कमकुवत झाली. तसेच ब्रिक्स चलनाबाबत ट्रम्प यांचा इशारा, युरोझोनमधील राजकीय अस्थिरता, कमकुवत देशांतर्गत स्थूल आर्थिक निर्देशक आणि परकीय भांडवलाची सततची माघार ही रुपयाच्या घसरणीची प्रमुख कारणे असल्याचे फॉरेक्स व्यापा-यांनी सांगितले.

चीन विरुद्ध भारत
चीन जगातील दुसरी सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेचा आकार भारतापेक्षा पाचपट जास्त आहे. पण गेल्या काही काळापासून चिनी अर्थव्यवस्थेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: रिअल इस्टेटची दुरवस्था झाली असून लोक पैसे खर्च करण्याऐवजी बचत करत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेबरोबर व्यापार युद्ध सतत वाढत असून बेरोजगारी शिगेला पोहोचली आणि परदेशी कंपन्या आपले बस्तान भरण्यात व्यस्त आहेत तर आता भारतातही अशीच चिन्हे दिसू लागली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR