पुणे : प्रतिनिधी
धुक्याचा अंदाज न आल्याने बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळल्याची भयंकर घटना घडली आहे. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
टेक ऑफनंतर अवघ्या ५ मिनिटांतच हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ऑक्सफर्ड गोड क्लब येथील हेलिपॅडवरून ७.३० वाजता हेलिकॉप्टरने टेक ऑफ केलं. त्याच्यानंतर ५ मिनिटांनी ही घटना घडली. धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील ऑक्सिफर्ड गोड क्लब येथील हेलिपॅडवरून हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मार्गस्थ झाले होते. हेलिपॅडपासून दीड किलोमीटर अंतरावरच असणा-या बावधन परिसरामध्ये धुक्याचा अंदाज न आल्याने ते कोसळले. त्यामध्ये दोन पायलट व एक इंजिनीअर होता. तिघांचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच पुणे आणि पीएमआरडी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परमजित राम सिंग (वय ६४) आणि गिरीश कुमार पिल्लाई (वय ५३) अशी मृत्यू पावलेल्या दोन कॅप्टनची नावे आहेत. तर प्रीतम चंद भारद्वाज (वय ५६) असे त्या इंजिनीअरचे नाव आहे. याअगोदरही बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली होती.