30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रविशाळगडावर घडलेली घटना दुर्दैवी

विशाळगडावर घडलेली घटना दुर्दैवी

शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर निषेध

इस्लामपूर : प्रतिनिधी
विशाळगडावर घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. शिवप्रेमींच्या नावाखाली काही गुंडांनी तेथे हैदोस घातला आहे. या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. सरकारने पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमणे काढायला हवी होती.

येथे हिंसाचार करणा-यांच्या पाठीशी जो कोणी असेल त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकही मत फुटले नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

आमदार जयंत पाटील म्हणाले, विशाळगडावरील घटना ही दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही कधी अल्पसंख्याक समाजाला अशी वागणूक दिली नव्हती. तेथील काही लोकांनी अतिक्रमण काढायला न्यायालयातून स्टे मिळवला आहे. उर्वरित लोकांची अतिक्रमणे शासनाने पावसाळा संपल्यानंतर काढायला हवी होती.

गजापुरात जो काही हिंसाचार झाला तो सच्चा शिवप्रेमींनी कधीच केला नसता. पोलिसांनीही यावेळी निष्काळजीपणा दाखवला. ज्यादा पोलिस फोर्स मागवला नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या गुंडांनी तेथील लोकांची घरे अक्षरश: लुटली.

ते म्हणाले, या घटनेमुळे उघड्यावर पडलेल्या लोकांचे शासनाने तातडीने पुनर्वसन करायला हवे. हिंसाचाराची ही घटना रोखता आली नाही हे शासनाचे अपयश आहे. या सर्व घटनेच्या मागे जो कोणी असेल त्याच्यावर शासनाने तातडीने गुन्हा दाखल करायला हवा. ही घटना दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहे. यामुळे राज्यात अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR