25.7 C
Latur
Tuesday, September 24, 2024
Homeराष्ट्रीयकोलकात्यातील घटनेची सुप्रीम कोर्टाकडून दखल

कोलकात्यातील घटनेची सुप्रीम कोर्टाकडून दखल

महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या, उद्या सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोलकाता आरजी कार रुग्णालयातील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ २० ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. या धक्कादायक घटनेचे देशभर पडसाद उमटले असून, सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच नराधमांवर कठोरातील कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणी देशभरात निदर्शने सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे. तसेच विविध रुग्णालयांतील डॉक्टरांनीदेखील अशीच मागणी केली. याशिवाय या घटनेच्या कारणांचाही तपास करून डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी आयएमएने केली.

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह गूढ परिस्थितीत सापडला होता. ती दुस-या वर्षाची पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनी होती. रुग्णालयातील कर्मचा-यांना तिचा मृतदेह आपत्कालीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आढळून आला. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत. गरज पडल्यास आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी म्हटले तर दुसरीकडे भाजपने या प्रकरणावर ममता सरकारवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे.

सीबीआयकडून तपास
आता हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३० संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये काही डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टर व कर्मचा-यांचा समावेश आहे. यासह सीबीआयने रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांचीही चौकशी केली आहे. बलात्कार व खुनाच्या घटनेनंतर डॉ. घोष यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

डॉक्टर, प्रशिक्षणार्थींचा हात असण्याची शक्यता
या प्रकरणी पीडित डॉक्टरच्या आईने प्रतिक्रिया दिली असून, महिला डॉक्टरवर कामाचा प्रचंड दबाव होता, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच मुलीवरील बलात्कार व हत्येमागे रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर व इंटर्न्सवर (प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी) असू शकतात, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR