मुंबई : सेमी इंग्लिश शाळांमधल्या शिक्षकांसाठी एक धोक्याची घंटा आहे. सेमी इंग्लिश शाळांमधील जे शिक्षक २०२२ मधील शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणा-यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय या शिक्षकांची इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून कौशल्य चाचणी घेण्यात येणार असून त्यात या शिक्षकांची कामगिरी असमाधानकारक राहिल्यास त्यांची सेवा समाप्त केली जाणार आहे.
याबाबतचे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत. पवित्र पोर्टलवर सेमी इंग्लिश शाळांकरता नोंदवण्यात आलेल्या मागणीला अनुसरून २०२२ मध्ये सरकारमार्फत एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील उत्तीर्ण शिक्षकांची आणखी एक कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे.
शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रादेशिक विद्या प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे. पवित्र पोर्टलवर सेमी इंग्रजी शाळांकरिता नोंदविण्यात येणा-या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता धारण करणा-यांमधून शिफारस करण्यात येणार आहे. या कौशल्य चाचणीत गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकाचे कौशल्य/ज्ञान असमानधानकारक असल्याचे आढळल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल, अशी अट नियुक्ती आदेशामध्येच नमूद करावी, अशा स्पष्ट सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत.