बारामती : आम्हाला महायुतीमधील पक्षांनी विश्वासात घेतले नाही, आम्हाला कोणत्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलावले नाही, त्यामुळे आम्ही महायुतीतून बाहेर पडल्याचा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. त्यामुळे आता महायुतीने परत बोलावले तरी जाणार नसल्याचे महादेव जानकर म्हणाले. इतकेच नाही तर महाविकास आघाडीमध्येही जाणार नाही, आमचे काय होईल यासाठी आम्ही खंबीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महादेव जानकर म्हणाले की, मी या निवडणुकीत कोणालाही सोडणार नाही. काँग्रेस आणि भाजप आम्हाला समान अंतरावर आहेत. दोन्ही पक्ष छोट्या पक्षांना खात आहेत. मी आमदार करणारा माणूस आहे, त्यांच्याकडे भीक मागत बसू का? अशी विचारणा महादेव जानकर यांनी केली. उद्याचे सरकार बनेल त्यावेळी मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही असा दावा सुद्धा महादेव जानकर यांनी केला. दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीवर बोलताना महादेव जानकर म्हणाले की भाजप म्हणेल आमचा विजय होत आहे, महायुती म्हणेल आमचा विजय होत आहे आणि महाविकास आघाडी म्हणेल आमचा विजय होत आहे. मला त्यांच्याबद्दल विचारू नका असे म्हणत महादेव जानकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्याबद्दल बोलण्याचा मी मक्ता घेतला नसल्याचे महादेव जानकर म्हणाले.
दरम्यान, दौंडमधील जागेविषयी बोलताना महादेव जानकर म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यभरात मिळावे सुरू आहेत. अनेक मतदारसंघाचे मिळून मेळावे घेतले जात आहेत. दौंडसाठी सक्षम उमेदवार आल्यानंतर नाव निश्चित केले जाईल असे त्यांनी सांगितल. आज लोकांची मत जाणून घेण्यात येतील. पार्लमेंटरी बोर्डाकडे ती यादी पाठवून नाव निश्चित केली जाईल असे त्यांनी सांगितले. दोन-तीन जणांची नावे आले आहेत. मात्र पार्लमेंटरी बोर्डाकडे अंतिम निर्णय असल्याचे महादेव जानकर म्हणाले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या तयारीवर बोलताना त्यांनी सांगितले की, आता उमेदवार जाहीर केला तर उमेदवार पळवून नेतील त्यामुळे २८८ जागांपैकी १९१ उमेदवारांची यादी जाहीर आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष नक्कीच खाते उघडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवारांची बारामती, देवेंद्र फडणीसांविरोधात नागपूर, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी या ठिकाणी सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात देखील कराडमध्ये देखील सभा घेणार असल्याचे महादेव जानकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामध्येही सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.