29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरमोकाट कुत्र्यांनी तोडले युवकाचे लचके

मोकाट कुत्र्यांनी तोडले युवकाचे लचके

लातूर : शहरातील पापविनाश रोड परिसरातील एका शेतात २० वर्षीय युवकाचे मोकाट तीन कुत्र्यांनी लचके तोडले. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा शासकीय रुग्णालयात सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय मदने (वय २०, रा. सुळ गल्ली, लातूर) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, लातुरातील सुळ गल्लीत राहणाऱ्या विजय मदने याच्यासह अन्य दोन मित्र पापविनाश रोड परिसरात असलेल्या एका शेतात सोमवारी रात्री पार्टी करत होते. दरम्यान, रात्री उशिरा सोबतचे दोन मित्र तेथून गेले. विजय मदने हा त्याचठिकाणी झोपाला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तीन मोकाट कुत्रे विजयवर तुटून पडले. कुत्र्यांनी विजयचे लचके तोडायला सुरुवात केली. त्यावेळी कुत्र्यांचा प्रतिकार करण्याचीही क्षमता विजयमध्ये नव्हती. अशा अवस्थेत कुत्र्यांनी विजयच्या शरीराचे मोठ्या प्रमाणावर लचके तोडल्याने तो गंभीर जखमी झाला. सकाळी परिसरातील नागरिकांना विजय जखमी अवस्थेत आढळून आला. याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याला मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्याला लातुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR