22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयजगण्यासाठी देशातील नागरिकांचा मासिक खर्च दुप्पट

जगण्यासाठी देशातील नागरिकांचा मासिक खर्च दुप्पट

नवी दिल्ली : देशातील एक वर्ग सातत्याने श्रीमंत होताना दिसत आहे. तर दुसरी वर्ग मात्र गरीब होताना दिसत आहे. दिवसेंदिवस गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढताना दिसतेय. दरम्यान, एका दशकात भारतातील सामान्य ग्राहकांच्या सरासरी मासिक खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारी आकडे बघितले तर गावातील सर्वात गरीब माणूस फक्त ४५ रुपयांवर आपले जीवन जगत आहे.

भारतात लोकांच्या खर्च करण्याच्या सवयी बदलत आहेत. देशात खेड्यांपासून शहरांपर्यंत ग्राहकोपयोगी वस्तूंवरील खर्च वाढत आहे. शहर आणि खेड्यातील गरीबांपैकी गरीब लोकांचा दैनंदिन खर्च खूपच कमी आहे. खेड्यातील गरिबांचे जीवन दैनंदिन ४५ रुपयांच्या खर्चावर चालते, तर शहरात राहणारा गरीब माणूस दिवसाला केवळ ६७ रुपये खर्च करू शकतो.

नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने अलीकडेच मासिक सरासरी दरडोई ग्राहक खर्च डेटा जारी केला आहे. हे आकडे घरगुती वापर खर्च सर्वेक्षण २०२२-२३ वर आधारित आहेत. यानुसार, गावात सर्वात खालच्या स्तरावर राहणा-या ५ टक्के लोकसंख्येचा दरडोई सरासरी मासिक खर्च केवळ १३७३ रुपये आहे. त्यानुसार, ते दररोज ४५ रुपयांवर चालते. शहरी लोकसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, शहरांमध्ये राहणा-या सर्वात गरीब ५ टक्के लोकसंख्येचा प्रति व्यक्ती सरासरी मासिक खर्च २००१ रुपये आहे. दररोज हा खर्च सुमारे ६७ रुपये येतो. गावातील श्रीमंत लोकांचा दरडोई मासिक सरासरी ग्राहक खर्च १०,५०१ (रु. ३५० प्रतिदिन) आहे. शहरी भागातील टॉप-५ टक्के श्रीमंत लोकांचा सरासरी मासिक ग्राहक खर्च २०,८२४ रुपये (सुमारे ६९५ रुपये प्रतिदिन) आहे.

मासिक ग्राहक खर्च दुप्पट वाढला
संपूर्ण देशाच्या लोकसंख्येची सरासरी पाहिली तर २०११-१२ च्या तुलनेत २०२२-२३ पर्यंत त्यांचा मासिक ग्राहक खर्च जवळपास दुप्पट वाढला आहे. २०२२-२३ मध्ये शहरी भागातील सध्याच्या किमतीनुसार देशातील कुटुंबांचा दरडोई सरासरी मासिक कौटुंबिक खर्च ६,४५९ रुपये अपेक्षित आहे. तर २०११-१२ मध्ये तो २,६३० रुपये होता. त्याचप्रमाणे, ग्रामीण भागात ते ३,७७३ रुपये झाले आहे, जे दशकापूर्वी १,४३० रुपये होते.

या वाढीचा आढावा घेतल्यास ग्रामीण लोकसंख्येच्या सरासरी मासिक कौटुंबिक खर्चात १६४ टक्के वाढ झाली आहे, तर शहरी लोकसंख्येच्या खर्चातही १४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. एनएसएसओ साधारणपणे दर ५ वर्षांनी ही आकडेवारी जाहीर करते. यावेळी दशकभराच्या अंतराने ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR