मुंबई : प्रतिनिधी
पुण्यात सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलली. आयबीपीएस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. पूर्व सेवा परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश न केल्याने त्याचीही प्रतिक्रिया उमटली होती. त्यामुळे आयोगाने आज बैठक घेऊन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.
बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी आयबीपीएसची परीक्षा २५ ऑगस्टला होणार आहे. याशिवाय एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षासुद्धा याच दिवशी होणार होती. आयोगाने विविध संवर्गातील पदभरतीसाठी २९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार परीक्षेसाठी २५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने परीक्षार्थी एका परीक्षेला मुकावे लागणार होते. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यातच लोकसेवा आयोगाने राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश केला नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थीनी पुण्यात ठिय्या आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना परीक्षार्थींच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आयोगाची आज बैठक झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
लवकरच तारीख जाहीर करणार
आता ५ ऑगस्ट रोजी आयोजित नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून प्रस्तुत परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांनी आयोगाचे आभार मानले.