27 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जतमधील तिहेरी हत्याकांडाचे गूढ उलगडले

कर्जतमधील तिहेरी हत्याकांडाचे गूढ उलगडले

नेरळ : कर्जत परिसरात तिहेरी हत्याकांडाची हृदय हेलावणारी घटना ऐन गणेशोत्सवामध्ये घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या तिहेरी हत्याकांडाचे गूढ उलगडले असून मृत मदन पाटील यांचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे.

कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील चिकण पाडा येथे राहणारा ३५ वर्षीय तरुण मदन पाटील व त्याची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील आणि मुलगा विवेक मदन पाटील या एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह घराजवळ असलेल्या ओहोळामध्ये रविवारी सकाळी सापडले होते. या प्रकरणी हत्याकांड की आत्महत्या अशा पार्श्वभूमीवर पोलिस तपास करत असताना मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणमंत पाटील व त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित आरोपी हणमंत पाटील यास घेऊन घटनास्थळी पोलिसांनी सोमवारी तपास केला. त्यामध्ये अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृत मदन पाटील, त्याची पत्नी अनिशा मदन पाटील आणि मुलगा विवेक मदन पाटील या तिघांच्या मृतदेहावरील घावांच्या जखमा दिसून आल्याने पोलिसांना हे हत्याकांड असल्याचा संशय आहे. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी धुळा ज्ञानेश्वर टेळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पाच टीम करण्यात आल्या.

तसेच रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून तपासाची सूत्रे वेगाने फिरवत या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हणमंत पाटील तसेच त्याच्या पत्नीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. ऐन गणेशोत्सवामध्ये हे हत्याकांड घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR