नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात ३२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३,७४२ झाली आहे. यासोबतच काल दिवसभरात केरळमध्ये आणखी एका कोविड बळीची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये शनिवारी १२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. याच दिवशी कर्नाटकात ९६, महाराष्ट्रात ३५ तर दिल्लीमध्ये १६ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी एका दिवसात देशात ४०० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेने शनिवारी समोर आलेली रुग्णसंख्या कमी असल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या जेएन.१ नव्या व्हेरियंटमुळे देशाचे टेन्शन वाढले आहे. या व्हेरियंटची लागण झालेल्यांना घशात खवखव होणे हे वेगळे लक्षण दिसून येत आहे. गंभीर लागण झाल्यास किंवा उपचार न घेतल्यास चक्क आवाजही जाण्याचा धोका व्यक्त करण्यात येतो आहे. केंद्र सरकारने या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. न्यू इयर आणि ख्रिसमस साजरी करताना कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.
आरोग्य संघटनेचा दिलासा
जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासादायक माहिती दिली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट वेगळा असला, तरी तो जास्त घातक किंवा धोकादायक असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जुन्याच लसींचा वापर करून याला आळा घालणे शक्य असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.