नाशिक : लोकसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून दोन दिवसांनी मतदान आहे. उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधानांसह पक्ष प्रमुखांच्या प्रचार सभा जोरदार सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांचे विविध पट जनतेने अनुभवले आहे.
राजकीय पक्षांमधील फूट, पक्ष फोडाफोडीचे राजकारण, मोठ्या नेत्यांचे बंड, सत्तेसाठी पक्षांतर, महाराष्ट्राच्या राजकारणाची झालेली चिरफाड.. या सर्व भावना जनतेच्या मनात घर करून आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये मतदानाची कमी झालेली टक्केवारीचिंताजनक आहे. यासाठी नवमतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. अंतिम टप्यातील प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतांना विकासाच्या मुद्यांऐवजी एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यात राजकीय मंडळी रमली आहे. लोकशाहीच्या निवडणूक उत्सवात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावताना देशाचे भविष्य असलेल्या तरुणांना नेमके काय वाटते, ते पाहणे गरजेचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात तोडफोडीचे राजकारण चालू आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास कमी होत चालला आहे. कोणत्याही पक्षावर विश्वास ठेवला तरी, त्यांच्या फायद्याचा पोळ्या ते भाजतात. त्यामुळे देशात लोकशाही नावाला जिवंत आहे. परिणामी तरुणांचा मुलांचा कल नोटाकडे आहे. लोकशाहीला काळीमा फासणा-या घटना घडतात तरी सरकार लक्ष देत नाही असे काहींचे म्हणणे आहे. महाराष्ट्राचे राजकारण बिहारच्या राज्यासारखे झाले आहे. कोणत्याही प्रकारची नीतिमत्ता राहिलेली नाही. लोकांना हेच काळत नाही, लोकशाही जिवंत आहे की नाही. महाराष्ट्रात स्वत:च्या फायद्यासाठी राजकारणी लोकांनी जनतेला वेड्यात काढले आहे मग, ते धर्माच्या नावावर असो की जातीपातीच्या नावावर. नाशिकची जनता नक्कीच परिवर्तन करणार असे काहींना वाटते.
सध्याचे महाराष्ट्रातले राजकारण बघता नाशिक लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत ही राजाभाऊ वाजे व हेमंत गोडसे यांच्यामध्ये आहे परंतु, तसे बघता नाशिकचा कोणताही विकास दिसत नाही. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. सध्या तरी नाशिक लोकसभा मतदारसंघ परिवर्तनाच्या मार्गावर आहे.
प्रत्येकाने नैतिकता दाखवावी
प्रत्येक पक्षाने नैतिकता राखायला हवी. आरोप-प्रत्यारोपानंतर पक्षापक्षांमध्ये भांडण होतात त्यातून मतदार संभ्रमात पडतात. रस्ते बंद करुन प्रचार करणे, अनधिकृत होर्डिंग्जमुळे झालेले मृत्यू या गोष्टी लोकशाहीला बाधक आहेत. केवळ प्रचार बघून सामान्यांचा विचार न करता सुज्ञ नागरिक मतदान करणार नाही. सामान्य नागरिकांना राजकारण्यांचा प्रचार किती प्रभावी आहे यापेक्षा आवाज उठवणारा, लढणारा खासदार हवा आहे.