28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरमंगळवेढा तहसील परिसरात निराधारांचे हाल

मंगळवेढा तहसील परिसरात निराधारांचे हाल

मंगळवेढा : मंगळवेढा तहसील परिसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात निराधारांचे हाल होत आहेत. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध पाच योजनांच्या लाभार्थ्यांना जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी हयात प्रमाणपत्र द्यावे लागते. शहरी व ग्रामीण भागातील तलाठ्यांकडे हे प्रमाणपत्र देण्याची तरतूद महसूल प्रशासनाने करण्याची गरज असताना वृद्धांना तहसील कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याने भर पावसात वृद्धांची, महिलांची फरपट होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी , तहसील कार्यालयात जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता आधार कार्ड, वयाचा पुरावा, बँकेचे पुस्तक असे दस्तावेज सादर करावे लागतात.

मात्र, गावपातळीवरील कार्यालयात हे दस्तावेज स्वीकारण्याची सोय करण्याची गरज असताना संजय गांधी कार्यालयात लाभार्थ्यांना जाण्याची वेळ आली आहे. काही तलाठी लाभार्थ्यांना थेट तालुका कार्यालयात पाठवत असल्याने वृद्धांचे हाल होत आहेत. प्रशासकीय पातळीवर होणारी परवड पाहून लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा, अपंग, वृद्धांना मासिक मानधन दिले जाते. या योजनेंतर्गत मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील ५९७४ लार्भार्थ्यांना महिन्याकाठी ८४ लाख २१ हजार रुपये वितरित केले जातात. यामध्ये संजय गांधी निराधार योजना ३०१९ लाभार्थ्यांना ४४ लाख ४० हजार ९०० रुपये मानधन दिले जाते. श्रावण बाळ योजनेच्या २ हजार ९१५लाभार्थ्यांना ३९ लाख ८० हजार वितरित केले जातात. ग्रामीण भागातील वृद्ध लाभार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शासनाने हयात प्रमाणपत्र देण्यासाठी तलाठ्यांना तसे निर्देश दिले आहेत. परंतु, काही तलाठी ही जबाबदारी घेण्यास नकार देत तहसील कार्यालयाकडे आपली जबाबदारी ढकलत आहेत अशी ओरड लाभार्थ्यांमधून होत आहे.

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी अनेक समस्या सहन कराव्या लागतात. त्यात हयात प्रमाणपत्र देण्यासाठी महिला, वृद्धांना भरपावसात तहसील कार्यालयात यावे लागते. यामध्ये संपूर्ण दिवस घालवावा लागतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे लाभार्थ्यांना मनस्ताप होत आहे.
आम्ही लाभार्थ्यांना तलाठ्यांकडे द्या म्हणून सांगितले आहे. परंतु, ते कार्यालयाकडे घेऊन येतात. याबाबत ८० टक्के काम झाले आहे. तरीही उर्वरित लाभार्थ्यांची कागदपत्रे तलाठ्यांमार्फत घेण्यात येईल.असे मंगळवेढ्याचे नायब तहसीलदार गुणवंत वाघमोडे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR