चिपळूण : ‘पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यापूर्वी संपूर्ण फुटेज चेक करावे. सगळा घटनाक्रम बघावा. आम्ही पोलिसांना पूर्वीच असे काहीतरी घडणार याची कल्पना दिली होती, पत्रव्यवहार केला होता. पोलिसांनी त्याची दखल घेतली का?’ असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला. ‘माझ्या कार्यालयासमोर तुम्ही वाट्टेल ते पोस्टर, बॅनर, झेंडे लावले. आमच्या चिपळूणच्या प्रथेप्रमाणे रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या परंपरेप्रमाणे तुमच्या एकाही पोस्टर, झेंड्याला हात लावला का?’ अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.
दरम्यान, चिपळूणमध्ये काल मोठा राडा झाला. राणे समर्थक आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी होती. आज भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर आपली बाजू मांडली.
‘निलेश राणेंची सभा गुहागरला होती. निलेश राणे मुंबईवरून आले. वास्तविक त्यांना गुहागरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. खेड-दापोलीतून दुसरा चिपळूण-पेडे परशुरामवरून ते थेट गुहागरला जाऊ शकत होते. तो मार्ग सोडून ते चिपळूण शहरात आत ६० किलोमीटरपर्यंत आले’ असे भास्कर जाधव म्हणाले. ‘या सभेआधी निलेश राणेंनी वातावरणनिर्मिती केली होती. त्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे माझ्या कार्यालयाबाहेर जमले होते. मी स्वत: कार्यालयात होतो’ असे भास्कर जाधव म्हणाले.
‘त्यांच्याकडून जे निरोप आले होते, त्यानुसार भास्कररावांच्या कार्यालयासमोर राडा करणार असे त्यांनी म्हटले होते, ते मी चालू देणार नाही. हे मी पोलिसांना सांगितले. ते चालू न देण्याची जबाबदारी माझी नाही, पोलिसांची आहे. म्हणून पोलिसांना पत्र दिले होते. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते तर झालेला प्रकार टाळता आला असता’ असे भास्कर जाधव म्हणाले.