पुणे : शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत, केंद्रातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे, उत्तरेकडील सर्व राज्यांची सत्ता त्यांच्या हातात आहे. सत्तेतील पक्षाची धोरणे सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहेत, असे शरद पवार म्हणाले. काल लोकसभेचे काम संपले. पंतप्रधानांचे तुम्ही भाषण बघितले असेल, राज्यसभेतील भाषण तुम्ही ऐकलं असेल, त्यात त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींवर हल्लाबोल केला.
ज्या कुटुंबातील व्यक्तींनी स्वातंत्र्य आंदोलनात १३ वर्षे तुरुंगात काढली, स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तींवर व्यक्तिगत हल्ले करण्यात आले. देशासाठी ज्यांनी त्याग केला, कष्ट केले, दिशा दाखवली त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करणे शहाणपणाचे नाही पण तशी भूमिका राज्यकर्त्यांकडून घेतली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
आज भाजपच्या विचाराविरुद्ध कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे आम्ही संसदेत बघितले. अलीकडे महाराष्ट्रात आणि देशाला नवे शब्द माहिती झाले. काही वर्षांपूर्वी ईडी हा शब्द माहिती नव्हता पण आता देशभर माहिती झाला आहे. २००५ ते २०२३ पर्यंत ईडीने सहा हजार केसेस नोंदवल्या. याच्या चौकशीनंतर सत्यावर आधारित केसेसची संख्या २५ इतकी निघाली. २५ पैकी ज्यांना शिक्षा झाली असे लोक केवळ दोन होते, असे शरद पवार म्हणाले.
ईडीचे बजेट ४०४ कोटी रुपये होते. ईडी कुणाच्या मागं लावली. आतापर्यंत १४७ नेत्यांची चौकशी करण्यात आली यापैकी ८५ टक्के नेते विरोधी पक्षांचे होते. भाजप सत्तेत आल्यानंतर ईडीचे हत्यार वापरले. आठ वर्षांत १२१ नेत्यांवर याद्वारे कारवाई करण्यात आली. या सगळ्यांमध्ये ईडीने कारवाई केली त्यात एकाही भाजपच्या नेत्याचे नाव नाही, याचा अर्थ काय असा सवाल शरद पवार यांनी केला. काही नेत्यांची ईडी चौकशी सुरू होती ती भाजप सत्तेत आल्यावर थांबवायचा निर्णय घेतला, असे शरद पवार म्हणाले.