22.1 C
Latur
Thursday, September 26, 2024
Homeमहाराष्ट्रपोर्शे कार अपघातानंतरचे कारनामे भोवणार

पोर्शे कार अपघातानंतरचे कारनामे भोवणार

गुन्ह्यांतील कलमांत वाढ

पुणे : पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलावर येरवडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी पुराव्यात छेडछाड, कट रचणे, खोटे दस्ताऐवज तयार करणे आणि नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना लाच दिल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमासह विविध कायद्यांनुसार मुलावर कारवाई होणार आहे.

अपघात झाल्यापासून त्याच्या तपासातील अनेक टप्प्यांची माहिती देणारा पुरवणी अहवाल गुरुवारी (ता. २६) पोलिसांनी बाल न्याय मंडळास (जेजेबी) सादर केला. त्यात पोलिसांनी वाढविलेली कलमे नमूद करण्यात आले आहेत. पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत एका अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. कल्याणीनगर येथे १९ मेला मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला होता. दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत जेजेबीमध्ये हजर केले होते. त्यानंतर काही दिवसांना मुलाला जामीन मंजूर करण्यात आला होता.

मुलाने त्याचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि आई शिवानी विशाल अग्रवाल यांच्यासह ससून रुग्णालयातील वॉर्ड नंबर ४० मध्ये आरोपी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना आरोपी अमर गायकवाड व अश्पाक मकानदार यांच्यामार्फत लाचेची प्रलोभने दिली. त्यानंतर ससूनचे अधिष्ठाता अजय तावरे याच्या सांगण्यावरून सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण पुरावा असलेले स्वत:चे रक्त बदलून त्याचे शिवानी अग्रवाल यांच्या रक्ताचा नमुना दिला.

हाळनोर यास रुग्णालयातील रजिस्टर तसेच तपासणी फॉर्मचे बनावटीकरण करण्यास भाग पाडण्याच्या गुन्ह्यात मुलाचा सहभाग होता. स्वत:चा रक्त नमुना नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलाने इतर आरोपीच्या संगनमताने फौजदारी पात्र कट रचून तो पूर्णत्वास नेला. आरोपी अतुल घटकांबळे यांच्यामार्फत तीन लाख रुपयांची लाच डॉ. हाळनोर याने स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मुलाविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार पुरवणी अहवाल जेजेबीमध्ये सादर करण्यात आला आहे. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससूनमधील डॉक्टरांसह इतरांवर दाखल असलेले सर्व कलमे मुलावर देखील दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR