22.6 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रवाळलेल्या गावरान मिरचीचे भाव कोसळले

वाळलेल्या गावरान मिरचीचे भाव कोसळले

शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघेना

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
वाळलेल्या तेजापूर या गावरान लाल मिरचीला प्रति किलो केवळ १५० रुपयांचा दर बाजारात मिळत आहे. त्यामुळे यातून लागवड खर्चही निघत नसल्याने सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी परिसरातील शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

तर, दुसरीकडे बाहेर जिल्ह्यातून व्यापा-यांनी खरेदी करून आणलेल्या रसगुल्ला मिरचीला ४५० रुपये दर बाजारात मिळत आहे. या दरातील तफावतीमुळे शेतकरी कंगाल, तर व्यापारी मालामाल होत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

वाळलेली मिरची खरेदी करून तिखट, मसाले तयार करण्याची लगबग सध्या ग्रामीण भागात जोरात सुरू आहे. त्यामुळे मिरची बाजारपेठ चांगलीच गजबजलेली दिसून येत आहे. बाजारात लाल मिरचीची सध्या मोठी आवक असून, मागणीच्या तुलनेत तिचे उत्पादन कमीच आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात ३५० रुपये किलोने मिळणारी मिरची आता ४५० रुपये किलो दराने विकत घ्यावी लागत आहे.

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, घरगुती मसाला तयार करण्याचा हाच हंगाम असतो. यंदा लाल मिरचीचा भाव वाढला असल्याने त्याचा ठसका ग्राहकांना बसत आहे. भाव वाढल्याने तिखट, गरम मसाल्याचे प्रमाण कमी केले जात आहे. शेतक-यांच्या वाळलेल्या तेजापूर गावरान लाल मिरचीला प्रति किलो १५० रुपये, तर व्यापा-यांजवळ असलेल्या रसगुल्ला मिरचीला ४५० रुपये, तर चपाटा जातीच्या मिरचीला ३५० रुपये प्रति किलो दर मिळत असल्याचे चित्र लिहाखेडी परिसरात बघायला मिळत आहे.

या दरातील तफावतीमुळे शेतकरी कंगाल, तर व्यापारी मालामाल होत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लिहाखेडी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी तेजापूर गावरान मिरची आणि चपाटा सिमला मिरचीची लागवड केली आहे. सिमला मिरचीला प्रति किलो ३५० रुपये हा दर मिळत आहे. परंतु, गावरान तेजापूर मिरचीला केवळ १५० रुपयांचा दर मिळत असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय गुंटूर मिरचीला १०० रुपयांचा दर मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR