18.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयताप, रक्तदाबाच्या औषधाची गुणवत्ता खराब!

ताप, रक्तदाबाच्या औषधाची गुणवत्ता खराब!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ताप, रक्तदाब, मधुमेह, पोटातील संसर्ग आदीसाठी वापरण्यात येणा-या औषधांची गुणवत्ता खराब आहे. एवढेच नव्हे, तर यातील अनेक औषधी बनावट आहेत. मोठ्या कंपन्यांच्या बॅ्रंडच्या नावाने बरीच औषधी विकली जाते, तीदेखील बनावट असल्याची धक्कादायक माहिती सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) मासिक रिपोर्टमधून समोर आली आहे. रुग्ण आणि नातेवाईकांना हे धक्का देणारे वृत्त ठरले आहे.

सीडीएससीओने त्यांच्या वेबसाइटवर एक यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पॅरासिटामोल, पॅन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंटसह ४८ औषध या चाचणीमध्ये फेल ठरल्याचे म्हटले आहे. या अहवालामुळे औषधांच्या वापरासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.

दर्जा तपासणीत अपयशी ठरलेल्या औषधांमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी ३ टॅबलेट, शेलकल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, एंटी-एसिट पॅन-डी, पॅरासिटामोल (आयपी ५०० मिलीग्रॉम), मधुमेहासाठी वापरली जाणारी ग्लिमेपिराइड आणि उच्च रक्तदाबासाठी घेतल्या जाणा-या टेल्मिसर्टन या औषधाचा समावेश आहे.

या औषधांची निर्मिती हेटेरो ड्रग्ज, अल्केम लॅबरेटरीज, हिंदुस्तान एटीबायोटिक्स लिमिटेड, कर्नाटक एंटीबायोटिक्स अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, प्योर अ‍ॅण्ड क्योर हेल्थकेअर आणि मेग लाइफसायन्सेस या कंपन्यांकडून केली जाते. पीएसयू हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेडद्वारे तयार केली जाणारी मेट्रोनिडाजोलदेखील क्वॉलिटी टेस्टमध्ये फेल झाली आहे. हे औषध पोट खराब झाल्यावर घेतले जाते.

दरम्यान, सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशननुसार बनावट औषधे ओळखणे फार अवघड असते. औषधे बनावट आहेत हे ओळखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रयोगशाळा आहे. कधी कधी बनावट औषधे ही साइज, शेप आणि कलरमध्ये थोडी वेगळी दिसते, तसेच त्यांची विक्री खराब पॅकेजिंगमध्ये केली जाते.

५३ पैकी ४८ औषधी फेल
सीडीएससीओने ५३ औषधांची गुणवत्ता चेक केली होती. ज्यातील ४८ औषधे त्याच्या मानकांवर खरी उतरली नाहीत. अन्य ५ औषधांना या यादीतून हटवण्यात आले. कारण त्यांनी बाजारात त्यांच्या नावाने बनावट औषधे विकली जात आहेत, असा दावा केला होता. तसेच या विकल्या जाणा-या औषधांची निर्मिती त्यांनी केलेली नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे ५ औषधांना यादीतून वगळले.

औषधाची परवानाधारक दुकानातूनच खरेदी करा
बनावट औषधाचा धोका लक्षात घेऊन परवाना असलेल्या दुकानांतूनच औषधे विकत घ्या आणि न विसरता बिल घ्यावे. औषधे कधीच अनोळखी व्यक्तींकडून किंवा खुल्या बाजारातून घेऊ नये. औषधे घेताना ते त्याच्या मूळ पॅकेजिंगमध्ये आहे का, हे तपासले पाहिजे. खराब गुणवत्तेचे औषध किंवा बनावट औषधांचे पॅकेजिंग आणि प्रिंटिंग खराब असते. विशेष म्हणजे औषध खरेदी केल्यानंतर डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR