नवी दिल्ली : भारतातील शेतक-यांसह सर्वांचे लक्ष मान्सूनच्या पावसाकडे लागलेले असते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर भारतात दाखल झाला. मात्र, महाराष्ट्रातील काही भागात पोहोचल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला होता. आता भारतीय हवामान विभागाने नव्याने जारी केलेल्या अंदाजानुसार ३ जूलैपर्यंत मान्सून देशात पुन्हा आगेकूच सुरु करेल. उत्तर पश्चिम भारतात मान्सूनचा पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे.
पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये मान्सूची प्रतीक्षा आहे. ११ जून नंतर भारतात मान्सूनचा वेगव मंदावला होता. दोन दिवसांपूर्वी मान्सून मध्य भारताच्या पुढे पोहोचला होता. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पुन्हा गती प्राप्त करेल. त्यावेळी चांगला पाऊस होईल त्यामुळे जूनमध्ये कमी झालेल्या पावसाची जुलैमध्ये भरपाई होईल असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून पुढील तीन ते चार दिवसात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमधील काही भाग, बिहारचा काही भाग आणि उत्तर प्रदेशातून पुढे जाईल. या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२७ जून नंतर उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एम. राजीवन यांनी मान्सून पुन्हा सक्रीय होत असल्याचे म्हटले. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून पोहोचेल. पुढच्या २-३ आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा हवामान विभागाला आहे.
ऑगस्टमध्ये ‘ला नीना’?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये ला नीना विकसित होण्याची अपेक्षा आहे. तर, अलनिनोमुळे भारतातील मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम होत असतो. अलनिनो निर्माण झाल्यास भारतात मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात होतो.
ब्रेकनंतर पुन्हा पाऊस सुरू होणार
गेल्या काही दिवसांपासून मान्सून खोळंबला होता. जवळपास ९ दिवस मान्सून नवसारी, जळगाव, मंडला, पेंड्रा रोड, झारसुगुडा, बालासोर, हल्दिया, पाकूर, साहिबगंज रक्सोलपर्यंत पोहोचला होता. पुढील तीन ते चार दिवसात अरबी समुद्राचा उत्तरेकडील भाग, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून पुढे प्रवास करेल.