24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयलाल समुद्रातील संकटामुळे जागतिक चिंता वाढल्या

लाल समुद्रातील संकटामुळे जागतिक चिंता वाढल्या

नवी दिल्ली : इस्रायल-हमास संघर्षामुळे होथी बंडखोरांनी लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे जागतिक चिंता वाढल्या आहेत. लाल समुद्रातील संकटामुळे सागरी मालवाहतुकीचे दर ६०० टक्क्यांनी वाढले असून त्यामुळे जागतिक व्यापाराला तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले. एका अहवालानुसार, लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत जागतिक व्यापाराचे प्रमाण १.३ टक्क्यांनी घटले आहे.

तांबडा समुद्र हा जगातील सर्वात महत्त्वाचा जलमार्ग मानला जातो. सुमारे १२ टक्के जागतिक व्यापार सामान्यतः बाब अल-मंदेब सामुद्रधुनीतून होतो. परंतु बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे व्यापार प्रवाह विस्कळीत झाला आहे. संभाव्य हल्ले टाळण्यासाठी जहाजांना आफ्रिकेचे दक्षिण टोक असलेल्या केप ऑफ गुड होपमधून जावे लागत आहे. त्यामुळे वस्तूंच्या वितरणात सुमारे १४-२० दिवसांचा विलंब होत असून वाहतुकीसोबतच विमा खर्चही वाढला आहे.

भारतीय निर्यातदार संघटनेचे महासंचालक अजय सहाय यांनी मंगळवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापार मंडळाच्या (बीओटी) बैठकीत मालवाहतूक वाढीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “ही एक गंभीर समस्या आहे आणि या समस्येमुळे विविध देशांतील महागाई वाढण्याबरोबरच वस्तूंच्या जागतिक मागणीलाही हानी पोहोचेल. काही ठिकाणी मालवाहतुकीचे दर ६०० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. अशा परिस्थितीमुळे त्यांनी भारतीय शिपिंग लाइन विकसित करण्याची विनंती सरकारकडे केली आहे.

आशियाई बाजारात घसरण
या घटनांचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण झाली आहे. जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययाचा (सप्लाय चेन क्रायसिस) हा परिणाम आहे, असे मानले जाते. इतर आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग या शेअर भाजतात घसरण झाली आहे.

या भागातून भारताचा ८० टक्के व्यापार
भारताचा युरोपसोबतचा ८० टक्के व्यापार लाल समुद्रातून जातो आणि अमेरिकेसोबतचा मोठा व्यापारही याच मार्गाने होतो. देशाच्या एकूण निर्यातीत या दोन भौगोलिक क्षेत्रांचा वाटा ३४ टक्के आहे. लाल समुद्र आणि भूमध्य समुद्राला हिंदी महासागराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीच्या आजूबाजूला हुथी बंडखोरांनी अनेक हल्ले सुरू केले आहेत, त्यामुळे या मार्गाने सागरी व्यापारावर विपरित परिणाम झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR