कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणांचा वाद मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. तसेच यादरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमणांवर आक्रमण करत शिवभक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली होती. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील राजकारण सध्या तापलेले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशाळगड येथे झालेल्या तोडफोडीवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली, याच्यामागे कोण आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
विशाळगडावरील दंगलीबाबत प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही दंगल मुळात ंिहदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली. याच्यामागे कोण आहे? याच्यावर काय कारवाई होणार आहे, याचा खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये जे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे जे धिंडवडे निघाले आहेत, त्याला राज्य सकरार जबाबदार आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून ज्या मशिदीच्या ठिकाणी हा वाद उदभवला आणि ज्या पद्धतीने याला हिंसक स्वरूप मिळाले, तसेच विशिष्ट्य समाजातील लोकांना लक्ष्य करून त्यांची घरं, वाहनं जाळण्याचा प्रयत्न झाला, ते अतिशय क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. अतिक्रमण काढत असताना हिंसक असलेला मोर्चा विशाळगडाच्या पायथ्याशी गेला. तसेच तेथील लोकांची घरं आणि वाहने जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली, असा दावा विजय वडेट्टीवार यांना केला.
सरकारच्या पायाखालची वाळू घसरली
ते पुढे म्हणाले की, मला असे वाटते की ही दंगल आणि त्यासोबतच्या घटना या सरकारच्या पायाखालची वाळू घसरल्याने, आपली गेलेली पत सुधारण्यासाठी सरकार हिंदू-मुस्लिम वाद तयार करून आपली पोळी भाजण्याचे पाप करत आहे, हे आथा स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर जाती आणि धर्मामध्ये दंगली घडवून आणून त्यातून लाभ मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न महायुती सरकारकडून केला जात आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.