25.3 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeराष्ट्रीयपहिल्याच पावसात राम मंदिराच्या छताला गळती

पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छताला गळती

मुख्य पुजा-यांनी केला दावा

अयोध्या : यावर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येमधील राम जन्मभूमी येथे बांधण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी अयोध्येसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. अयोध्येतील भव्य राम मंदिर पाहण्यासाठी हजारो भाविक दररोज अयोध्येत येत असतात. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोट्यवधी राम भक्तांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याचा दावा करण्यात येत आहे. रामललांचे प्रमुख पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी हा दावा केला आहे.

रामललांचे प्रमुख पुजारी आचार्च सत्येंद्र दास यांनी केलेल्या दाव्यानुसार अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाच्या छतामधून काही दिवसांपूर्वी पाण्याची गळती होत होती. त्यानंतर दुरुस्तीचे काम करून ही गळती बंद करण्यात आली. त्यानंतर मान्सूनपूर्व पहिल्या पावसामध्ये मंदिरात पुजा-यांचे बसण्याचे ठिकाण आणि व्हीआयपी दर्शनासाठी जिथे लोक येतात, त्याठिकाणी पावसाचं पाणी गळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने हे पाणी बाहेर काढण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. रामललांचे मुख्य पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी उघडण्यात आले होतें. मात्र मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात रामललांच्या मंदिरातील छताला गळती लागली आहे.

मोठ्या प्रमाणात पाण्याची होत असलेली गळती धक्कादायक आहे. राम मंदिराच्या बांधकामामध्ये काही हलगर्जी झाल्याचे दिसत आहे. रात्री पाऊस पडला. तसेच सकाळी पुजारी जेव्हा पूजेसाठी मंदिरात गेले, तेव्हा तिथे पाणी भरलेलेल दिसून आले. खूप प्रयत्न करून हे पाणी मंदिर परिसरातून बाहेर काढण्यात यश आले अशी माहितीही त्यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR