22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाने शेवटचा डाव टाकला, चार जणांची यादी भाजपकडे

शिंदे गटाने शेवटचा डाव टाकला, चार जणांची यादी भाजपकडे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये या चार जागांवरुन धुसफूस आहे. मात्र, शिवसेनेने आपल्या इच्छुक उमेदवारांची नावे भाजपकडे पाठवली. या चारही जागा जिंकण्यासाठी लागणारे समीकरण आणि योग्य उमेदवार शिवसेनेकडे आहेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

सध्या महायुतीत वादात असलेल्या चारही जागी शिवसेनेचे खासदार आहेत. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे, शिर्डीत सदाशिव लोखंडे आणि नाशिक लोकसभेत हेमंत गोडसे खासदार आहेत. यापैकी अरविंद सावंत आणि राजन विचारे सध्या ठाकरे गटात आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईत आले होते. यावेळी अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. या बैठकीत अमित शहा यांनी भाजप मुंबईतील सहापैकी पाच जागा लढवेल, असे स्पष्ट केले होते. तसेच लोकसभेच्या एकूण ३२ मतदारसंघात आमचेच उमेदवार रिंगणात उतरतील, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. एकनाथ शिंदे यांना या प्रस्तावाला विरोध केला होता. शिंदे गटाने माघार घेतली नाही. मुंबईसह नाशिक, ठाणे आणि शिर्डीची जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे अजूनही ठाम आहेत.

महायुतीच्या ४८ पैकी ४६ जागा निश्चित?
ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा, यासाठी पक्षाचे स्थानिक नेते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे स्वत: ठाण्यात राहतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यादृष्टीने ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची आहे. परिणामी एकनाथ शिंदे ही जागा सोडण्यासाठी तयार नाहीत. तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांनी परस्पर हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केल्याने भाजपचे शांतीगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी याठिकाणी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे. तर दक्षिण मुंबईची जागा भाजपने मनसेला देण्याचे ठरवल्याची चर्चा आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्यांकडून ४८ पैकी ४६ जागांबाबत एकमत झाल्याचे सांगितले जात असले तरी अनेक जागांचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे आता २८ मार्चला महायुतीचे अंतिम जागावाटप जाहीर झाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होऊ शकेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR