आळेफाटा : जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराची सांगता झाली असून २० नव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. जुन्नर निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. त्यातच नगर कल्याण महामार्गावर आणे एसएसटी पथकाने सोमवारी दुपारी नाकाबंदी सुरु असताना प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक ताब्यात घेतल्या असून त्यामध्ये १३६१ कुकर मिळून आले आहे. या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत असून पुढील तपास केला जात आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी सांगितले कि, नगर कल्याण महामार्गावर आणे एसएसटी पथकाला एक ट्रक प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक मिळून आला. त्याची बिल्टी चेक केली असता ट्रक लातूर येथून अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात माल पोच करण्यासाठी जाणार होता. मात्र ट्रक राहुरीकडे न जाता आळेफाटा दिशेने येत होता म्हणून संशय आला. त्यांनी ट्रक आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिला असता पोलिसांनी चालकाकडे अधिकची चौकशी केली. त्याने आळेफाटा येथे प्रेशर कुकरचा ट्रक घेऊन येण्यास सांगितले.
ट्रकमधील १३६१ प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याने त्यांनी प्राथमिक तपासात पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी याबाबतचा अधिकची माहिती निवडणूक विभागाला दिली असून अधिकचा तपास करून पुढील कारवाई केली जाणार आहे.