माळशिरस : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील गारवाड या गावी ८५ हजार रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला. सविस्तर वृत्त असे की, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात हातभट्टी दारू, परराज्यातील दारू तसेच अवैध विदेशी दारू विरुद्ध कारवाई करण्यात येत असून याच मोहिमे अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकाने गारवाड (ता. माळशिरस) गावचे हद्दीत मामा भानुदास हुलगे वय ६२ वर्षे या इसमाने त्याच्या शेतातील पत्र्याचे शेडमध्ये लपवून ठेवलेला ८४ हजार सातशे रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला.
या कारवाईत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंच १८० मिली क्षमतेच्या नऊशे साठ बाटल्या व ९० मिली क्षमतेच्या पाचशे बाटल्या असा एकूण ८४ हजार ७०० रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माळशिरस संदीप कदम, दुय्यम निरीक्षक अकलूज राजेंद्र वाकडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेज शेख, जवान तानाजी जाधव, गजानन जाधव व वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने केली.