पुणे : प्रतिनिधी
जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे, मात्र, आता महाराष्ट्राचा भूगोलच धोक्यात आहे. कारण येथील जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचे अस्तित्व संपवले जात आहे. याची सुरुवात रायगडपासून होणार असून, न्हावा शेवा शिवडी सी लिंकमुळे रायगडचे वाटोळे होणार आहे, अशी भीती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ते बोलत होते. भूगोल ताब्यात घेण्यासाठी आतापर्यंत संघर्ष झाला, त्यालाच इतिहास म्हटले जायचे. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. तो अतिशय हुशारीने विकत घेतला जात आहे. पण यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे अस्तित्व संपण्याचा धोका आहे. याचा पहिला फटका रायगड जिल्ह्याला बसणार आहे. येथे बाहेरचे लोक येतात, जमिनी घेताहेत. त्यामुळे रायगडचे लोक येथे नोकर होऊ शकतात. तसेच न्हावा शेवा शिवडी सीलिंकने रायगडचे वाटोळे होणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले. बुलेट ट्रेनची गरज काय, हे मला अजूनही कळालं नाही. दोन तासामध्ये मुंबईमधून अहमदाबादला जाण्याने कुणाचा फायदा होणार आहे? त्यासाठी एक लाख कोटी रुपये कशाला खर्च करायला पाहिजे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मध्यमवर्गाने राजकारणात यावे
महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय समाजाने सर्व ठिकाणी पुढे आले पाहिजे, राजकारण असो वा समाजकारण यात मध्यमवर्गाने भाग घेतला पाहिजे. कारण महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली. देशातल्या सर्व विचारांना महाराष्ट्राने जन्म दिला. जातीपाती आणि इतर गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा आपण सुज्ञ झाले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
निवडणूक लढवायला खरेच लाज वाटते
मला निवडणूक लढायला लाज वाटते. कारण गेली ७० वर्षे काय तर माझे आजोबा, काका जे बोलले आज मीही तेच बोलत आहे. अरे तेच ते विषय, मग आपण पुढे कधी जाणार? नाटक, कलाकार, साहित्यिक हे नसते तर कधीच अराजकता आली असती. कारण लोक तुमच्यात गुंतून पडतात, असे राज ठाकरे म्हणाले.