चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत देवगाव फाटा येथील एका हॉटेल समोरून मंगळवार, दि. ३० रोजी दुपारी कार चोरीला गेली होती. कार चोरणा-या एका आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध चारठाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर पंडित काळे (रा. हाताळा जिल्हा हिंगोली, ह.मु.आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे) यांच्या मालकीची असलेली ८ लाख १५ हजार रुपये किंमतीची एम.एच १४ के.क्यू ५२८३ या क्रमांकाची टोयोटा गॅलन्झा कंपनीची पांढ-या रंगाची कार दि.३० जानेवारी रोजी दुपारी २च्या सुमारास हॉटेल वाटिका देवगाव फाटा येथून चोरीला गेल्याची घटना घडली होती. याबाबत मंगळवारी रात्री चारठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चारठाणा पोलिसांनी तपास चक्रे फिरवून आरोपी अण्णा शिंदे (रा. केकर जवळा ता.मानवत जि.परभणी) यास ताडबोरगाव ता. मानवत येथून बुधवारी दुपारी १.३०च्या सुमारास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील वसलवार हे करीत आहेत.