22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात

राज्यातील ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात

सातारा : प्रतिनिधी
राज्यातील ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, जवळपास १२० कारखान्यांचा चालू वर्षीचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. सद्य:स्थितीत १,०३७ लाख ८९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, सरासरी १०.२१ टक्के उता-यानुसार १,०५९ लाख २२ हजार क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे.

चालू वर्षी राज्यात १०३ सहकारी व १०४ खासगी मिळून २०७ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू होते. त्यांपैकी १२० साखर कारखाने २७ मार्चअखेर बंद झाल्याची माहिती साखर सहसंचालक राजेश सुरवसे (विकास विभाग), साखर सहसंचालक सचिन भराटे यांनी दिली आहे.

चालू वर्षी ऐन पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी झाल्याने, उसाची किमान वाढ न झाल्याने व शेवटच्या टप्प्यात पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने उसाचे, पर्यायाने साखरेचे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने व बहुतांश ऊसतोड कामगार गावी परतल्याने उपलब्ध ऊसतोडीस विलंब होत आहे. पाण्याअभावी वाळून गेलेला ऊस ऊसतोड कामगार जाळून ऊसतोडणी करत आहे. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतक-यांना बसत आहे. त्यामुळे सर्वच भागातील बळीराजामधून संताप व्यक्त केला जात आहेत.

राज्यात ऊसगाळप, साखर उत्पादन व उता-यात कोल्हापूर विभागाने आघाडी कायम राखली आहे. त्या खालोखाल पुणे विभाग दुस-या स्थानावर आहे. गतवर्षी २०२२-२३ च्या हंगामात २७ मार्चअखेर एकूण २११ कारखान्यांनी १,०५० लाख २५ हजार टनांइतके ऊस गाळप पूर्ण केले होते.

२७३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
२७ मार्चअखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात कोल्हापूर विभाग ऊसगाळप, साखर उत्पादन व उतार्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागात ४० कारखान्यांद्वारे २३७ लाख ३१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे; तर सरासरी ११.५३ टक्के उता-यासह २७३ लाख ५३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करत कोल्हापूर विभागाने गाळप, उत्पादन व उता-यात आघाडी कायम राखली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR