25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

- ३ वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर बसलेल्यांच्या बदल्या करा - निवडणूक आयुक्तांचे आदेश, राज्यात ९ कोटी ६० लाख मतदार

मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे; परंतु दुर्दैवाने शहरी भागात मतदारांमध्ये बरीच उदासीनता दिसते, अशी खंत व्यक्त करताना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावा, असे आवाहन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज केले. ३ वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदावर व गृह जिल्ह्यातील अधिका-यांची कोणताही अपवाद न करता तात्काळ बदली करण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले. २६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी निवडणूक होईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू २ दिवसांच्या मुंबई दौ-यावर आले होते. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची तसेच निवडणूक कामाची जबाबदारी असलेल्या अधिका-यांची आणि पोलिस अधिका-यांच्या बैठका घेऊन त्यांनी सर्व आढावा घेतला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निवडणुकीच्या तयारीची संपूर्ण माहिती दिली.

महाराष्ट्रात एकूण ९.५९ कोटी मतदार आहेत. ज्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ४.५९ कोटी आणि महिला मतदारांची संख्या ४.६४ कोटी आहे. १८ ते १९ वयोगटातील प्रथमच मतदान करणा-यांची संख्या १९.४८ लाख असल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडणुकीत २२ टक्के महिला मतदार वाढले असून दिव्यांग मतदारांची संख्या ६ लाख ३० हजार आहे. राज्यात १०० वर्षांवरील मतदारांची संख्या ४९ हजार आहे. ८५ वर्षांवरील मतदारांना त्यांनी फॉर्म भरून सादर केल्यास घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेतले जाईल. एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. अजूनही मतदार यादीत नाव आहे की नाही ते तपासून नाव नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.

निवडणुकीत पैशाचा वापर, पेड न्यूज, दारू व अंमली पदार्थांचा सुळसुळाट आदी बाबींना पायबंद घालण्यासाठी लोकसभा निवडणुकीत कठोर उपाययोजना करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत देशात १० हजार कोटी रुपयांची रोकड पकडली होती. या वेळीही कठोर उपाययोजना केल्या जातील, असे राजीव कुमार यांनी सांगितले. निवडणूक आयोगाची खाजगी विमाने, हेलिकॉप्टर या वरही नजर असेल. नेत्यांच्याही हेलिकॉप्टर, विमानाची तपासणी होईल. निवडणूक आयोगाने एक अ‍ॅप तयार केले आहे. त्यावर कोणालाही कुठे गैरप्रकार होत असेल तर तक्रार करता येईल. ९० मिनिटांच्या आत तेथे अधिकारी पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.

उमेदवारांनी गुन्ह्याची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावी
उमेदवारांना आपल्या अर्जासोबत मालमत्ता व गुन्ह्यांची माहिती द्यावी लागते. ती आयोगाच्या वेबसाईटवर लगेच उपलब्ध होईल. गुन्ह्यांची माहिती उमेदवारांना वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करावी लागेल. एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता अशा व्यक्तीला उमेदवारी का दिली, याचे स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाला द्यावे लागणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

एटीएमसाठी पैसे वाहतुकीवर निर्बंध
निवडणुकीत पैशाचा वापर होऊ नये यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. एटीएमसाठी पैसे घेऊन जाणा-या गाडीला निवडणूक काळात रात्री ६ ते सकाळी ८ पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही.

अ‍ॅम्ब्युलन्स बँकेवरही नजर
निवडणुकीदरम्यान अ‍ॅम्ब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावरदेखील लक्ष ठेवले जाईल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल. जो सभेसाठी मैदान मिळण्यासाठी आधी अर्ज करेल, त्याला मैदान देण्याची संधी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

-विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया त्या आधी पूर्ण करावी लागेल.
-राज्यात ९ कोटी ५९ लाख मतदार, पुरुषांची संख्या ४.५९ कोटी, महिलांच्या संख्या ४.६४ कोटी
-१ लाख १८६ हजार मतदान केंद्रे
-२२ टक्के महिला मतदार वाढले
-६.३ लाख दिव्यांग मतदार
-१०० वर्षांवरील शतायुषी मतदारांची संख्या ४९ हजार.
-१९.४८ लाख मतदार प्रथमच मतदान करणार.
-शहरातील सर्व मतदान केंद्रात सीसीटीव्ही असतील यासाठी प्रयत्न

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR