23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयमतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, निकालाची उत्सुकता शिगेला

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, निकालाची उत्सुकता शिगेला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही व्यवस्था असलेल्या भारताच्या १८ व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार असून, ६५ कोटी मतदारांनी कोणाला कौल दिला ते दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. मतदानोत्तर जनमत चाचण्यांमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मोदी सरकार विजयाची हॅट्ट्रिक करणार की अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत इंडिया आघाडी चमत्कार घडवणार, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, सकाळी ८ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाजप आणि विरोधी पक्षांचेही दावे आहेत. एकीकडे भाजप ४०० पार करण्याचा नारा देत आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेस, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव आदी नेत्यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही पूर्ण बहुमत मिळविले होते. यावेळीही भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळवू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु काही एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीदेखील बाजी मारू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे निकाल काय लागणार, याची उत्सुकता वाढली आहे.

देशभरात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मागच्या दोन निवडणुकीइतकी पंतप्रधान मोदी यांची छाप दिसली नाही. त्यांनी अनेक ठिकाणी सभांचा धडाका लावला आणि देशभरात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाने इंडिया आघाडीची स्थापना करून मित्र पक्षांच्या माध्यमातून भाजपशी ताकदीने लढत दिली. त्यामुळे इंडिया आघाडी देशात किती जागा मिळविते, यावर बरेच गणित अवलंबून आहे. मात्र, मागच्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी इंडिया आघाडीने मजबुतीने लढा दिल्याने त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलमधून देशात पुन्हा मोदी यांचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, खरे चित्र उद्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR