नवी दिल्ली : कोरोना महामारीला सुरुवात होऊन चार वर्षे झाली आहेत, परंतु महामारीचा धोका अजूनही कमी होताना दिसत नाही. चार वर्षांत देशभरात ४.५ कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला आणि ५.३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नवीन वर्षात कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. देशात कोरोना संसर्गाची दिवसेंदिवस वाढणारी प्रकरणे आता आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढवत आहेत.
यासह सक्रिय प्रकरणांची संख्या आता ४,३०९ झाली आहे. उल्लेखनीय आहे की, यापूर्वी १९ मे रोजी ८६५ प्रकरणे समोर आली होती. आरोग्य तज्ञ कोरोनाचे नवीन जेएन.१ प्रकार हे सध्याच्या संसर्ग प्रकरणांचे मुख्य कारण मानत आहेत. अभ्यासात, त्याच्या संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जाते, याशिवाय, हा प्रकार शरीरात लस-संसर्गामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती कमी करून लोकांमध्ये संसर्ग सहज वाढवतो, त्याबाबत शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.
आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, बहुतेक संक्रमित लोक सहज बरे होत आहेत ही दिलासादायक बाब आहे. बहुतेक लोकांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४.४ कोटींहून अधिक आहे, रिकव्हरी रेट ९८.८१ टक्के आहे. याशिवाय, देशात आतापर्यंत लसीचे २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत, ज्यामुळे गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यात मदत होत आहे.
नियमावलीचे पालन करण्याचा सल्ला
दरम्यान, कोरोनाच्या नवीन उपप्रकाराने (जेएन.१) चिंता वाढवली आहे. मिळालेल्या माहतीनुसार, लसीचा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे, हा धोका लक्षात घेता, तज्ज्ञांनी नागरिकांना नियमावलीचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
दररोज सरासरी ५००-६०० नवीन प्रकरणे समोर
गेल्या १० दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दररोज सरासरी ५००-६०० नवीन प्रकरणे समोर येत आहेत. रविवारी (३१ डिसेंबर) सकाळी ८ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अपडेट केलेली आकडेवारी आणखीनच भितीदायक आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविड-१९ चे ८४१ नवीन रुग्ण आढळले आहेत, जे २२७ दिवसांतील सर्वाधिक आहे.