32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रदबावातून तिकिट कापले

दबावातून तिकिट कापले

भावना गवळींचा भाजपावर निशाणा

मुंबई : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांनी ४५ प्लसचा नारा दिला होता. मात्र, जनतेने महायुतीला नाकारत महाविकास आघाडीला विजयी केली. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या तर महायुतीला केवळ १७ जागाच जिंकता आल्या. अशातच आता वाशिम लोकसभा मतदारसंघातून तिकिट कापण्यात आलेल्या भावना गवळी यांनी निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना थेट भाजपावर आरोप केले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना भावना गवळी यांनी लोकसभा निवडणूक निकाल आणि त्यांचे तिकिट का कापण्यात आले? यावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत जनतेने काहीतरी मनात ठरवले होते, असेच दिसते आहे. संपूर्ण वाशिम आणि यवतमाळची जनता अनेक वर्षांपासून खासदार म्हणून मला पाहत आहे. मी काम केलं आणि शिवसेना पक्षाची धुरा सक्षमपणे या विभागात सांभाळत आले. पण यावेळी जे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले, त्याचाच हा एक भाग आहे. जनतेची जी इच्छा होती, ती इच्छा कदाचित पक्षाच्या वरिष्ठांकडून पूर्ण झाली नाही. त्यामुळे जनतेने मतांच्या रूपाने त्यांना दाखवून दिले आहे, असा हल्लाबोल भावना गवळी यांनी केला.

सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजे, असे म्हणत भावना गवळी म्हणाल्या की, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मी होते. त्यांनी मागील अनेक वर्षांपासून माझ्यावर विश्वास दाखवला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव होता, असे म्हणायला आता काही हरकत नाही. हेमंत पाटील यांनीही मान्य केले होते की, ही स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे. त्यामुळे मलाही असे वाटते की, जेव्हा अशा स्क्रिप्ट लिहिल्या जातात, तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात, असा आरोप करत भावना गवळी यांनी भाजपाचे नाव न घेता टीका केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मला तिकिट देण्याची तळमळ होती. मात्र, त्यामध्ये अनेक अडचणी आल्या, असा आरोपही भावना गवळी यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR