सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांचे व सोलापूरचे माजी आणि ठाणे येथील सध्याचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांचे प्रशासकीय व आर्थिक अधिकार गोठवण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश एसटी प्रशासनाने काढले. विभाग नियंत्रक यांच्यावरच अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आल्याने अधिका-यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोलापूर विभागाचे माजी विभाग नियंत्रक विलास राठोड यांची ठाणे येथे बदली झाली होती. राठोड आणि सध्याचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव या दोघांबाबत काही कर्मचा-यांनी विविध तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची एसटी महामंडळाने दखल घेत एसटी प्रशासनाची सर्वांत कडक कारवाई करत या दोन्ही अधिका-यांचे आर्थिक व प्रशासकीय पदभार काढून घेण्याचे आदेश काढले आहेत.
त्यात सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक भालेराव यांचे पदभार सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. तर विलास राठोड यांचा पदभार पालघरचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी काढले आहेत.