मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच नव्हे तर विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकावण्यासाठी आपल्यावर दबाव होता. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार असेल तरी त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे होते. गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती तर मुंबई बँक प्रकरणात प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सांगलीतल्या विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या आतषबाजीत रोज नवनवीन व धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. परमबीर सिंह यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना आणखी काही दावे केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला. एवढेच नव्हे तर तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही एका खोट्या गुन्ह्यात अडकावण्याचा प्रयत्न होता; परंतु मी राजकारणासाठी पोलिस विभागाचा वापर होऊ दिला नाही त्यामुळे माझ्या विरोधात ठाण्यात बोगस केसेस दाखल करण्यात आल्या. सर्व बाबींचे माझ्याकडे व्हीडीओ पुरावे आहेत. माझ्याकडे असलेले पुरावे ईडी, सीबीआयकडे दिले आहेत. गरज भासल्यास योग्य वेळी सगळं समोर आणेन.
उद्धव ठाकरेंना दोन-तीनदा वर्षावर भेटलो. पवारांना सिल्वर ओकवर भेटलो. त्यांनी ऐकून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जुलै २०२० मध्ये मी मेरिटनुसार डीसीपींची बदली केली गेली होती मात्र त्यावर स्टे लावण्यात आला नंतर त्यातील काही अधिका-यांची पुन्हा पोस्टिंग करण्यात आली. अधिका-यांकडून पैसे काढण्यासाठी हा प्रकार केला गेला. माझ्याकडे असलेले पुरावे ईडी, सीबीआयकडे दिले आहेत. ललितमध्ये बसून सलिल देशमुख, कुंदन शिंदे आणि एजंटसह एकत्र डिलींग करत होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.