बुलढाणा/अहेरी : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील दोन मतदार संघ सध्या चर्चेचे ठरले आहेत. या दोन्ही मतदार संघात मुली आपल्या काका आणि वडिलांना आव्हान देत आहे. यामुळे निवडणुकीचे लक्ष आता या दोन्ही मतदार संघावर वळाले आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदार संघ आणि गडचिरोलीमधील अहेरी विधानसभा मतदारसंघातील हा विषय आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात ते आहेत. आता त्यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाकडून मैदानात उतरणार आहे. यामुळे यंदा या मतदार संघात बाप-लेकीची लढाई रंगणार असे दिसते.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली होती. तेव्हा भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार यांनी भाग्यश्री आत्राम यांना समजवण्याचा प्रयत्न केला. बापासोबतच राहा, अशी भावनिक साद घातली. परंतु भाग्यश्री आत्राम माघार घेण्याच्या तयारीत नाही. त्या आता निवडणूक आखाड्यात वडिलांविरुद्ध उतरणार आहेत.
काका-पुतणी लढत : बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यानंतर ते शरद पवार यांच्या पक्षात आले. त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या पक्षात राजेंद्र शिंगणे येताच त्यांची पुतणी गायत्री शिंगणे नाराज झाली झाली. त्या अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच त्या देखील सिंदखेडराजा मतदार संघातून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामुळे या ठिकाणी काका आणि पुतणी यांच्यात अशी लढत रंगणार आहे.