27.1 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रश्रीनिवास वनगांचा ठावठिकाणा लागेना

श्रीनिवास वनगांचा ठावठिकाणा लागेना

उमेदवारी नाकारल्यामुळे व्यथित, कुटुंबीय चिंतेत, पोलिसांकडून शोध सुरू

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदेंच्या शिवसेनेने पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली असून ऐनवेळी भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. यामुळे निराश झालेल्या श्रीनिवास वनगा यांनी काल आत्महत्येची धमकी दिली होती. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असताना सोमवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता निघून गेलेले वनगा नॉट रिचेबल आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीय चिंतेत असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

२ वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली तेव्हा पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा शिंदे गटात सहभागी झाले होते. सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली जाईल, असा शब्द शिंदे यांनी दिला होता. ते परत निवडून येऊ शकणार नाहीत, असे चित्र असल्याने त्यांना उमेदवारी नाकारून भाजपमधून आयात केलेले माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. पालघरमध्ये उमेदवारी देणार नसाल तर निदान डहाणूमधून उमेदवारी द्यावी, अशी त्यांची मागणी होती; पण तिकडेही उमेदवारी मिळाली नाही. यामुळे व्यथित झालेल्या यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपला विश्वासघात झाल्याचा आरोप केला.

बंडामध्ये सामील ४० आमदारांपैकी ३९ आमदारांना पुन्हा उमेदवारी संधी दिली मात्र फक्त आपला पत्ता कापला गेल्याने दुखावलेल्या वनगा यांना पत्रकार परिषदेत रडू कोसळले होते. सोमवारी सायंकाळी माध्यमांसमोर व्यथा मांडल्यानंतर ७ वाजायच्या सुमारास रडत रडत त्यांनी कोणाला काही न सांगता घर सोडले. बाहेर जाऊन येतो, असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. घराच्या दरवाज्यापाशी उभ्या असणा-या एका अज्ञात वाहनात बसून ते बाहेर निघून गेल्याचे समजते. सकाळपर्यंत परत न आल्याने नातेवाईकांकडे त्यांची विचारपूस करण्यात आली; पण कुठेही ते पोहोचले नव्हते. मग पोलिसांनीही त्यांचा ठाव ठिकाणा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वनगा यांचा मोबाईल नॉट रिचेबल आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR