जिंतूर : जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण, फुलवाडी येथील महिलांनी पंचवटी तांडा या ठिकाणी दि.६ जुलै रोजी सकाळी १० वाजता दारु विक्रेत्यांच्या घरी धाड मारुन गावठी दारु नष्ट केली. यानंतर महिलांनी तात्काळ हा दारू अड्डा बंद करावा म्हणून थेट जिंतूर पोलीस स्टेशन गाठले. यावेळी जवळपास ५०पेक्षा जास्त महिलांनी संबंधितावर तातडीची कारवाई करण्याची मागणी केली.
या गावठी दारू अड्ड्यामुळे तीन ते चार गाव, तांडा, वस्ती मधील महिला गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्त होत्या. अनेक महिलांचे नवरे, तरुण मुले या हातभट्टीच्या दारूला बळी पडल्यामुळे दररोज महिलांना घरामध्ये मारहाण, वादाचे प्रकार घडत आहेत. महिलांना दररोज नाहक त्रास यामुळे सोसावा लागत होता. पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील कारवाई केली जात नसल्याने शेवटी वैतागलेल्या महिलांनी शनिवारी सकाळी थेट हातभट्टी विक्रेत्याच्या घरी पोहोचल्या. यावेळी हातभट्टी विक्रेता व महिला यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. महिलांनी त्याला दारू विक्री न करण्याची विनवणी केली परंतु त्याने अर्वाच्च भाषा वापरल्याने शेवटी महिलांनी त्याच्या घरात असलेली जवळपास १०० लिटर हातभट्टी दारू नष्ट केली. यावेळी पोलिसांना ११२ नंबरवर संपर्क साधुन माहिती दिली. संबंधित प्रकरणाची पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांनी दखल घेत संबंधित हातभट्टी विक्रेत्याला ताब्यात घेतले असून स्थानिक गुन्हे शाखेकडे संबंधित माहिती कळविणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.