25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रजयंत पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

जयंत पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

इस्लामपूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची शपथ इस्लामपूर शहरातील पक्षाच्या पदाधिकारी, बुथ अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यासोबतच साहेब, तुम्ही महाराष्ट्र सांभाळा. आम्ही गावं सांभाळतो, अशी भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मला माझ्या मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. मात्र, माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर प्रदेश अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरे करत आहेत. यासोबतच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला चांगली कामगिरी करायची असून, सत्ताधारी महायुती सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचा विडा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उचलला असून, त्या दृष्टिकोनातून जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटाकडून दहापैकी आठ जागा विजयी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोठा वाटा होता. आता हीच विजयाची पताका पुन्हा विधानसभा निवडणुकीत फडकवण्यासाठी जयंत पाटील कामाला लागले आहेत. त्यामुळे आपल्या स्वत:च्या मतदारसंघांमध्ये त्यांना जास्त वेळ देता येत नाही. असे असले तरी जयंत पाटील फक्त निवडणुकीच्या तोंडावर नव्हे तर सतत मतदारसंघात मतदारांना भेटत असतात. विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना विक्रमी मताधिक्य देणा-या इस्लामपुरातील बुथना अनुक्रमे १ लाख व ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. कृष्णेचे संचालक संजयकाका पाटील व राजारामबापूचे संचालक शैलेश पाटील यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR