नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी’मधील संशोधकांनी ज्ञात अवकाशातील सर्वांत वेगाने विस्तारणा-या कृष्णविवराचा शोध लागल्याचा दावा केला आहे. हे तेजस्वी कृष्णविवर एका सूर्याला दररोज गिळंकृत करू शकेल एवढी त्याची क्षमता असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला.
‘नेचर अॅस्ट्रोनॉमी’ या नियतकालिकामध्ये या कृष्णविवराबद्दचा संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात करण्यात आलेल्या दाव्यानुसार यापूर्वी शोध लागलेल्या कृष्णविवरांपेक्षा हे कृष्णविवर सर्वात मोठे आहे. या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १७ अब्जपट जास्त आहे. ज्या वेगाने हे कृष्णविवर विस्तारत आहे, त्याचा अतितीव्र वेग पाहता त्यातून उत्सर्जित होणारा प्रकाश आणि उष्णता हे देखील जास्त आहे असे या संशोधनाचे प्रमुख ख्रिश्चन वुल्फ यांनी सांगितले. आतापर्यंत संशोधकांना एवढ्या मोठ्या कृष्णविवराचा शोध कसा लागला नाही ही आश्चर्याची बाब आहे असे मत या संशोधनात सहभागी असलेले संशोधक ख्रिस्तोफर ओंकेन यांनी व्यक्त केले.
असा लागला शोध
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी न्यू साऊथ वेल्स येथील वेधशाळेतून २.३ मीटर दुर्बिणीचा वापर करून या कृष्णविवराचा शोध लावला. त्यानंतर या कृष्णविवराची अधिक माहिती घेण्यासाठी तसेच त्याचे नेमके स्वरूप, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे वस्तुमान समजावून घेण्यासाठी जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिंणींपैकी एक असलेल्या दुर्बिणीच्या माध्यमातून या कृष्णविवराचे स्वरूप समजावून घेतले. या कृष्णविवरातून उत्सर्जित होणारा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी १२ अब्ज प्रकाशवर्षे वेळ लागत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
विश्वातील सर्वात तेजस्वी वस्तू
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक ख्रिश्चन वुल्फ यांनी सांगितले की या कृष्णविवरामधून उत्सर्जित होणारा प्रकाश पाहता हे कृष्णविवर म्हणजे विश्वातील आतापर्यंतची सर्वात तेजस्वी वस्तू आहे. हे कृष्णविवर आपल्या सूर्यापेक्षा पाच लाख अब्जपट तेजस्वी आहे.