मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले पण राळेगणमध्ये कूसही बदलली नाही हे दुर्देर्वाने सांगायला लागत असल्याचे म्हणत संंजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला.
अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचे काम अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी केले. नाहीतर अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती? रामलीला मैदान, जंतर मंतर रोड कधी पाहिला असता? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहित झाले, नाहीतर ते राळेगणचे दैवत होते. पाणीप्रश्न आणि शेतीच्या प्रश्नावर काम करत होते. भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईला केजरीवाल आणि सिसोदिया यांनी तोंड फोडले, अण्णा हजार त्याचे प्रतिक होते.
त्यानंतर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचे सरकार असेल त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही हे दुर्देर्वाने सांगायला लागत आहेत. भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. अण्णा हजारे गांधीवादी आहेत, जर त्यांनी आताही सत्याची कास धरली तर आजही आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत असे सजय राऊत यांनी म्हटले आहे.
आनंदाचा शिधा, लाडका भाऊ इतर ज्या काही योजना आहेत त्याचा एकनाथ शिंदेसुद्धा भाग होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजना बंद करत आहेत त्यामुळे या विषयावरती एकनाथ शिंदेंनी आवाज उठवला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये शिंदे होते. या योजनांचे अनेक ठिकाणी शिंदेंनी उद्घाटन केले आहे. गरिबांच्या योजना बंद का केल्या जात आहेत? अदानींच्या योजना चालू राहतात असे म्हणत राऊतांनी शिंदेंवर टीका केली.
तानाजी सावंत अमित शहांच्या पक्षाचे ज्येष्ठे नेते आहेत. त्यांचा मुलगा पळून गेला, अपहरण झाले, मला माहित नाही. महाराष्ट्रामध्ये खंडणी अपहरण अशी प्रकरणे रोज घडत आहे. पण श्रीमंतांची मुलं आहेत, ती स्वत:च्या चार्टर प्लेनने बँकॉकला पळून जातात. गरिबांची मुले परिस्थितील गांजून बेरोजगारी, महागाई आणि बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून निघून जातात. हा शेवटी त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, यावर फार राजकीय चर्चा करू नये असे संजय राऊत म्हणाले.