मुंबई : पूंछ भागात गुरुवारी जवानांवर हल्ला झाला असून ४ जवान शाहिद झाले आहेत. यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या दहशदवादी हल्ल्याची सरकारला खबर नाही. हा पुलवामाचा कट आहे. तुम्ही पुन्हा पुलवामा सारख्या विषयांवर मते मागणार आहात का? राजकारणासाठी इतके क्रूर झाले आहे का? असा सवाल करत राऊत यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दात टीका केली. सुरक्षेबाबत प्रश्न विचारले तर आम्हाला देशाच्या बाहेर काढतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, दोन महिन्यातील जवानांच्या मृत्यूचे आकडे पाहा, सरकार काय करत आहे, हा प्रश्न आहे. आपले शत्रू काश्मिरमध्ये जवानांवर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. सरकारला त्याची माहितीच नाही. ही गंभीर बाब आहे. इकडे संसदेत लोक घुसतात, हल्ला करतात त्याचीही माहिती नाही. तुम्ही जवानांवरुन पुन्हा राजकारण करणार आहात का? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावरुनही मोदी सरकारवर टीका केली. राम मंदिर उद्घटानाला उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही. यांनी बाळासाहेबांनाही बोलावले नसते. राम मंदिर ही काही कोणाची वैयक्तिक संपत्ती नाही. राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेचे मोठे योगदान आहे. पण ज्यांनी योगदान दिले त्यांनाच उद्घाटनाला बोलावले नाही, असे राऊत म्हणाले.