अमरावती : महायुतीने माझ्या मागण्या मान्य केल्या तर मी विधानसभा निवडणूक लढणार नाही. माझी जागा महायुतीला देईन, असे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी रविवार दि. १४ जुलै रोजी येथे जाहीर केले.
मी महायुतीमध्ये आहे, असे कुठेही म्हटले नाही. आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत. त्यामध्ये शेतकरी आणि दिव्यांगांचे मुद्दे असतील. महायुतीने माझ्या मागण्या मान्य केल्या तर मी विधानसभेची निवडणूक लढणार नाही. माझी जागा महायुतीला देईन, असे कडू यांनी सांगितले.
पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे एमआरजीएस मधून करण्यात यावी, शेतक-यांसाठी ५० टक्के नफा धरून भाव जाहीर झाला पाहिजे, दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळावा, शिक्षण आणि आरोग्यामध्ये वाढत चाललेली विषमता कमी व्हावी, जिथे जिल्हाधिका-यांचा मुलगा शिक्षण घेतो त्याच शाळेत गरीब मजुराचा मुलगा शिकू शकला पाहिजे, अशा अठरा प्रकारच्या मागण्या महायुती समोर ठेवणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. मागण्या मान्य झाल्यास आमदारकीची निवडणूक लढणार नाही.
मी केलेल्या मागण्या महायुतीने मान्य केल्यास मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही. येत्या १९ तारखेला या मागण्या संदर्भात निवेदन महायुतीकडे देण्यात येणार आहे. ९ ऑगस्टला संभाजीनगरमध्ये आमचा मोर्चा आणि संमेलन होणार आहे. त्यामध्येच पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.